IPS ऐश्वर्या शर्मांकडून मटक्यावाल्यांना पहिला ‘झटका’, केडगावच्या ‘या’ आरोपींना अटक

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील यवत आणि दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या ऑनलाइन मटका आणि जुगार अड्ड्यांवर दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने धाड टाकून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल आणि १५ जणांना काल जेरबंद केले होते. अटक करण्यात आलेले बहुतांश तरुण हे केडगाव परिसरातील असल्याने DYSP शर्मांचा “मटक्याचा पहिला झटका” केडगावच्या तरुणांना बसल्याची चर्चा दिवसभर केडगाव परिसरामध्ये सुरू आहे.

मटका धाडीत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये केडगाव गावठाणातील राज रमेश गायकवाड, विशाल माणिक गायकवाड, राजू माणिक गायकवाड, या तरुणांचा समावेश असून त्यांच्या सोबतच सुधीर चंद्रकांत चौधरी, सचिन ज्ञानदेव कोळपे, सुखदेव आनंदराव चौधरी, रामभीम बहादूर खटका, विजय बळीराम लोकरे, रामदास बाळू कुंभार, किरण एकनाथ मोहिते, एकनाथ ज्ञानदेव कुंभार, दत्तात्रय अशोक माळवदकर, विकास थोरात या आरोपींचा समावेश आहे. यातील काही आरोपींचे कनेक्शन हे कायम गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग असणाऱ्या काही आरोपींसोबत असल्याची मोठी चर्चा आहे.

भांडगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन मटका चालत असल्याची माहिती दौंडच्या विभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना खबऱ्या मार्फत मिळाली होती. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भांडगाव या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या क्राईम ब्रँचचे सहायक पोलीस निरीक्षक शेखर यादव, यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कापरे, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, पो.कॉ. संभाजी कदम यांना सोबत घेऊन छापा मारला. त्यावेळी वरील मुद्देमाल आणि आरोपी त्या ठिकाणी मिळून आले.