पुणे : ससाणेनगर रस्त्यावर नियमांची ‘ऐशी’ की ‘तैशी’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ससाणेनगर रस्त्यावर एरव्ही वाहतूककोंडी, हवा आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक त्रासल्याच्या तक्रारी कार्यकर्ते करत होते. मात्र, आता कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. नागरिकांना घरामध्ये राहण्याचे आवाहन केले जात आहे, तरीसुद्धा ससाणेनगर रस्त्यावर प्रशासनाच्या नियमांना तिलांजली देऊन नागरिक रस्त्यावर गर्दी करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जात आहे, तरीसुद्धा त्याचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे आता पोलिसांनी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. अन्यथा काही मोजक्या आगाऊ आणि बेफिकीर नागरिकांमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढला जाईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.

हडपसरमधून ससाणेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या कालव्याच्या पुढे रेल्वे गेटपर्यंत नागरिकांची भरदुपारी प्रचंड वर्दळ दिसत आहे. सेल्फ डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला आहे. मेडिकल किराणा मालाची दुकाने आणि भाजीपाला विक्रीच्या नावाखाली अक्षरशः सुरक्षेयंत्रणेचे बारा वाजवले आहेत, असा आरोपच नागरिकांकडून होत आहे.