विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांकडून शुल्कासाठी ‘तगादा’, पालकवर्गामध्ये संताप – शाळा बंद, गाडीची चाकेही बंद, मग पैसे कसले मागता

पुणे : पोलीसनामाऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे मार्च अखेरपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांना शाळत घेऊन जाण्यासाठीच्या बसेस, रिक्षा, बसेस बंदच आहेत. तरीही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांकडून पालकांकडे एप्रिल आणि मे महिन्याच्या शुल्कवसुलीसाठी तगादा लावत आहेत.

तुम्ही मुलांची शाळेत नेआण केलीच नाही, तर पैसे का द्यायचे असा प्रश्न अनेक पालकांनी उपस्थित केला आहे. आमच्यासुद्धा कंपन्या बंद आहेत, दुकाने बंद आहे, त्यामुळे आम्हालाही पगार नाही. त्यामुळे शुल्क आकारणीवरून पेच निर्माण झाला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये पालक आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे.

शाळा आणि शिक्षकांची विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि स्कूल बसचालकांनी करू नये. कारण रिक्षा आणि स्कूलबसेस शाळेला सुटी असल्यानंतर बंद असतात. तुम्ही रस्त्यावर त्यावेळी रिक्षा चालवू शकता,  त्यासाठी बंधन नाही. स्कूल बसेससुद्धा व्यवसाय करू शकतात. सुटीच्या दिवशी स्कूलबस आणि रिक्षा बंद असल्याने पेट्रोल वा डिझेलचा खर्च नसतो. तसे शाळा आणि शिक्षकांचे काम सुटी असली तरी सुरू असते. त्याच्या कामाशी तुलना करणे योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकवर्गातून मांडण्यात येत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने १५ मार्चपासून राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची वाहने बंदच आहेत. उद्योग-धंदे, व्यवसाय, कंपन्या आणि इतरही सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे अनेकांना एप्रिल महिन्याचा पगार मिळाला नाही आणि मे महिन्याचासुद्धा मिळणार नाही, अशीच अवस्था आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्याच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना पैसे देण्याविषयीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शैक्षणिक वर्ष जून ते एप्रिलदरम्यान असते. यात अनेक वाहतूकदार सुटीच्या दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीतील महिन्याचे शुल्क घेतात. परस्पर सामंजस्याने पालक आणि वाहतूकदारात शुल्क आकारणीची प्रक्रिया ठरते. यंदा लॉकडाउनमुळे शैक्षणिक वर्षातील किमान दोन महिने वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे या महिन्यांचे शुल्क का द्यावे, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. पुणे शहरात सहा हजारांहून अधिक स्कूल बसचालक आहेत, तर रिक्षाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांच्यापुढेही आर्थिक पेच निर्माण झाला आहे, तसेच पालकवर्गांपुढे आहे, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.

विद्यार्थ्यांची वाहतूक देण्यासाठी आम्ही कायमच कटिबद्ध असतो. त्यामुळे अन्य कोणताही व्यवसाय करत नाही. आमचे उत्पन्नाचे हे एकमेव साधन आहे. अशा परिस्थितीत शालेय वर्षाचे नेहमीप्रमाणे शुल्क मिळावे, हीच अपेक्षा आहे. काही ठिकाणी ११, तर काही ठिकाणी १२ महिन्यांचे शुल्क घेण्यात येते. त्यानुसारच पालकांनी शुल्क द्यावे. कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, त्यामुळे कर्तव्य म्हणून मदत करणे अपेक्षीत आहे, अशी भावना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांनी व्यक्त केली.

आमची कंपनी दोन महिन्यापासून बंद आहे, त्यामुळे एप्रिल महिन्याचा पगार मिळाला नाही, आता मे महिन्याचासुद्धा पगार मिळणार नाही, असे चित्र आहे. त्यातून घरातला खर्च कसा भागवायचा असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातच मुलांची ने-ण करणारे रिक्षाचालक पैसे मागत आहेत. आतापर्यंत आम्ही समाजाच्या दडपणामुळे देत होतो. मात्र, आता आमच्याकडे पैसेच नाही, तर द्यायचे कुठून असे रामटेकडी येथील विद्यार्थी पालक आशिष गायकवाड यांनी सांगितले.

हडपसरमधील पालक राणी राकेश वाघमारे म्हणाल्या की,विद्यार्थी प्रवासी वाहनचालक उन्हाळा आणि दिवाळीच्या सुटीचे पैसे का घेतात हा प्रश्न आहे. ही मंडळी शाळा आणि शिक्षकांची बरोबरी करतात. हे योग्य नाही. कारण शिक्षक उन्हाळा आणि दिवाळीच्या सुटीमध्ये कार्यरत असतात. तुमची वाहने बंद असतात, वाहनांसाठी खर्चच नाही, व्यवसाय करण्यासाठी बंदी नाही, काहीजण वाहने रस्त्यावर चालवून पैसे कमावतातसुद्धा. मग तुम्हाला शुल्क का द्यायचे असा प्रश्न आहे. मागिल दोन महिन्यापासून शाळाच बंद आहेत, परिस्थिती पाहून त्यांनी स्वतःच पैसे घेऊ नयेत, असा प्रामाणिक सल्ला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले की, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, स्कूल बसेससह पालकवर्गाची परिस्थिती अडचणीची आहे. आजच्या परिस्थितीमध्ये दोघांनीही समजून घ्यायला हवे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like