पुण्यात संचारबंदीत ‘त्या’ गॅस व्रिकेत्याची चांदी, 790 चा गॅस 1200 रूपयांना, चौघांवर गुन्हा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा व वस्तू सुरू असताना देखील संचारबंदीचा फायदा घेऊन 790 रुपयांचे 1200 रुपयांना गॅसची विक्रीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. खडकी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 46 गॅस जप्त केले आहेत.

नरेंद्र रघुवीरसिंग ठाकूर (वय 31, रा. दापोडी), विजय जीवन मुदलियार (वय 46), श्रीकांत विश्वासराव पाटील आणि ऋषीकेश श्रीधर भोपटकर (वय 47) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत उपनिरीक्षक अमोल भोसले यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

देशभरात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. यापर्श्वभुवर देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर राज्यात संचारबंदी घातली आहे. सर्व दुकाने, कंपन्या तसेच इतर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, यातून अत्यावश्यक वस्तू आणि सेवा वगळण्यात आल्या आहेत. यात घरघुती वस्तू, गॅस, अन्यधान्य, मेडिकल सेवा आहेत.

मात्र यानंतर देखील खडकी भागात घरघुती गॅसची संचारबंदी काळात चढ्या दराने विक्री केली जात असल्याची माहिती उपनिरीक्षक अमोल भोसले यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी याची बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यावेळी 790 रुपयांचा गॅस 1200 रुपयाना विक्री केला जात असल्याचे दिसून आले.
पोलीस निरीक्षक एस. एस. पठाण आणि उपनिरीक्षक भोसले यांच्या पथकाने खडकीमधील छाजेड पेट्रोल पंपाजवळील भाऊ पाटील रोडवर छापा टाकून गॅसचा काळाबाजार उघडकीस आणला आहे. पोलिसांनी जागीच दोघांना ताब्यात घेतले आहे. तर इतरांचा शोध घेतला जात आहे.

भारत गॅस कंपनीचा हा गॅस असून, श्रीकांत पाटील गॅस एजन्सीचे मालक आहेत. तर चालक ऋषीकेश भोपटकर यांच्याशी संगनमताने विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 46 गॅस, रोकड आणि तीन चाकी टमटम असा 97 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.

संचारबंदी कालावधीत नागरिकांची अडवणूककरून कोणी चढ्या दराने वस्तू विक्री करत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या कालावधीत बनावट सॅनीटायझर पकडले होते. तसेच, अश्या पध्दतीने बनावट वस्तू किंवा काही अवैध प्रकार करत असतील तर त्याची माहिती देखील कळवावी असे आवाहन केले आहे.

You might also like