Pune : OLX वरून सोफा विक्री पडली महागात, महिलेला 1 लाख 42 हजारांना फसवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ओएलएक्सवरून सोफा विक्री करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले असून, सोफा खरेदी करण्याचे आमिष दाखवत पैशासासाठी क्यूआरकोड पाठवून त्याद्वारे1लाख 42 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली आहे.

याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विपीनकुमार नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सिंहगड रोड परिसरात राहतात. ओलएएक्सवर त्यांनी त्यांच्या घरातील सोफा विक्रीसाठी टाकला होता. त्यावेळी आरोपीने त्यांना फोन करून सोफा खरेदी करायचा असून, वानवडी भागात माझे फर्निचरचे दुकान असल्याचे सांगितले. तसेच त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि फर्निचर विक्रीस होकार दिला. त्यावेळी आरोपीने त्यांना एक क्यूआरकोड पाठविला. सोफ्याची रक्कम पाठविण्यासाठी तो स्कॅन करण्यास सांगितला. तो क्यूआरकोड स्कॅन केल्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यातून पैसे कमी झाले. याबाबत फिर्यादी यांनी आरोपीला फोन करून त्यांचे पैसे खात्यातून कमी झाल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपीने पुन्हा क्यूआरकोड पाठवला व तो पुन्हा स्कॅन करण्यास सांगितला. अशा दोन वेळा आरोपीने खात्यामधून 1 लाख 42 हजार रुपये मोबाईल बँकिंगव्दारे काढून घेतले. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सायबर पोलिसांनी तपास करून हा गुन्हा दाखल करून तो दत्तवाडी पोलिसांकडे वर्ग केला.