काय सांगता ! होय, पुण्यात चक्क लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटर चालू, पोलिसांकडून 4 महिलांसह 6 जणांवर FIR

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  चतुःश्रुगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉकडाऊन काळात स्पा सेंटर सुरू ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तबल चार महिलांसह 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बाणेर येथील गणराज चौकात ही कारवाई केली आहे.

अशोक शंकर जाधव (२९, रा. राजगड व्हिला, आंबेगाव पठार), जितेंद्र बाबासाहेब नंदीरे (३१, रा. काळेवाडी) यांच्यासह चार महिलांवर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई तेजस रमेश चोपडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रोड येथील गणराज चौकातील कळमकर कॉप्लेक्समध्ये जाधव यांचे फिजिओथेरपी आयुर्वेदिक स्पा सेंटर आहे. शासनाच्या आदेशानुसार लॉकडाउन असल्यामुळे सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. असे असतानाही शनिवारी संध्याकाळी गणराज चौकातील स्पा सेंटर जाधव यांनी सुरू ठेवले होते. याची माहिती मिळाली. त्यानुसार चतुःश्रुगी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे स्पा सुरु करण्यासंदर्भात परवागनी नव्हती. त्याठिकाणी कोणीही तोंडाला मास्क लावल्याचेही आढळून आले नाही. त्यामुळे सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस अधिक तपास करीत आहेत.