Lockdown : पुणे परिसरातील मोठ्या दुकानाला ‘दणका’, नियमांचे उल्लंघन पडलं महागात

पुणे : पोलसीनामा ऑनलाइन –   पुणे आणि परिसरामध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाय योजना केल्या जात आहेत. तसेच लॉकडाऊन करण्यात आले असून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळामध्ये खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने ठरवून दिलेल्या वेळेतच दुकाने उघडण्याचे आदेश असताना सर्रासपणे रोजच दुकानं उघडी करून सामानांची विक्री करणाऱ्या एका मोठ्या दुकानाला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करत दुकान सील केले आहे.

खडकी बाजार परिसरातील श्रीराम मंगल कार्यालय जवळ खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे व्यापारी संकूल असून यामध्ये होलसेल किराणा भूसाराचे दुकाने आहेत. यापैकी राजेश ट्रेडिंग या दुकानाला बंद काळात बेकायदेशीर दुकान उघडून व्यवसाय करत असताना खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य निरीक्षक कलावंत पवार हे अतिक्रमण पथकासह कर्तव्य बजावत असताना त्यांना हे दुकान सुरु असल्याचे दिसून आले.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य निरीक्षक कलावंत पवार यांनी दुकानावर कारवाई करून दुकानाला टाळे लावून सील केले. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत सम विषम तारखे प्रमाणे दुकाने सुरु करण्यास बोर्डाने परवानगी दिली आहे. असे असतानाही खडकीत काही ठिकाणी सर्रासपणे दोन्ही बाजूची दुकाने अनेक वेळा उघडी असल्याचे दिसून येत आहेत.

सराफ बाजारात तर दररोज एका बाजूची दुकाने अर्धवट शटर उघडे करून सुरु असतात. तरीही बोर्डाचे अधिकारी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तक्रार आल्यानंतर फक्त त्याच दुकानावर कारवाई केली जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.