Pune : पैसा जनतेचा, खर्च करतेय सरकार मिजास मात्र भलत्याचीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पैसा जनतेचा, खर्च करतेय सरकार आणि मिजास मात्र भलत्यांचीच असा काहीसा प्रकार शहर-उपनगर आणि परिसरामध्ये दिसून येत आहे. कोरोना महामारीमध्ये प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असल्याची संधी साधून बाजारबुणग्यांची विनापरवाना फ्लेक्सच्या माध्यमातून फुकटात प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. विनापरवानगी फ्लेक्स उभारणाऱ्यावर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सूज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

केंद्र, राज्य आणि महानगरपालिका प्रशासनाने कोविड सेंटर सुरू केलेल्या कोविड केंद्राबाहेर आणि आसपास फुकट्यांनी स्वतःचे विनापरवाना फ्लेक्सव उभारून प्रसिद्धी मिळविण्याची नामी संधी साधली आहे. पाऊस पडला की, भूछत्र्या उगवतात, त्याप्रमाणे महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे इच्छुकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला आहे. ही बाब सूज्ञ नागरिकांपासून लपून राहिली नाही, त्यामुळे त्याची खुमासदार चर्चा परिसरामध्ये सुरू झाली आहे.

कोरोनाग्रस्तांना मदत करीत असल्याचा केविलवाणा प्रयत्न या मंडळींकडून विनापरवाना फ्लेक्सच्या माध्यमातून सुरू झाला आहे. त्यामुळे उपनगराला बकाल स्वरूप प्राप्त होत आहे. एरवी दुकानाचा फलक थोडा बाहेर आला किंवा मोठा झाला, तर अतिक्रमण विभाग त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुटून पडतो. उपनगरातील चौकाचौकात गर्दीच्या ठिकाणी विनापरवानगी फ्लेक्सवर अमूक-तमूक मदत केल्याचे सांगून नेत्याच्या छायाचित्रशेजारी स्वतःचे छायाचित्र झळकविण्यात धन्यता मानणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे हात ओले केले जात असल्यामुळे एक पाऊल पुढे टाकण्याऐवजी एक पाऊल मागे घेत आहे.

मागिल वर्षभरापासून कोरोनामुळे समाज भयभीत झाला आहे. लॉकडाऊन आणि अनलॉकमुळे सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तातडीने उपचार करून घेण्यासाठी प्रत्येकाची धावाधाव सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. कोविड सेंटर सुरू करण्यासाठी स्वयंघोषित नेत्यांनी पत्रव्यवहार, निवेदने देण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला आहे. कोरोनाग्रस्तांना मागिल वर्षभरापासून मदत करीत असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकून प्रसिद्धी मिळविण्यात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे सामान्यांची उपचाराविना तडफड होत आहे. व्हॅक्सीन घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. उपचारार्थींच्या नातेवाईकांची पैसे जमविण्यासाठी दमछाक होत आहे. रक्त आणि प्लाझ्मा देता का अशी आरोळी देत आहेत. त्याकडे या भामट्यांचे लक्ष जात नाही. मात्र, जमेल त्या मार्गाने फुकटात चर्चेत राहण्याचा उपद्व्याप काही मंडली करीत असल्याचे पाहून सूज्ञ नागरिकांनी तीव्र संताप यक्त केला.

कोरोना महामारीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मंडळींना जेवायलासुद्धा वेळ मिळत नाही. खासगी हॉस्पिटलसह शासकीय हॉस्पिटलमधील सर्वांचीच अवस्था सारखी आहे. प्रशासनातील काही मंडळी चांगले काम करीत आहेत, तर काही मंडळी कोरोना झाल्याचे सांगून काम टाळण्यात धन्यता मानत आहेत. अगदी लोकप्रतिनिधीसुद्धा एखाद्याला मदत हवी असेल, तर मी क्वारंटाईन असल्याचे सांगून मदत देण्याचे टाळत आहेत. हीच मंडळी मदत केल्याचे सोशल मीडियावर फोटो टाकून प्रसिद्ध मिळवित आहेत. या प्रवृत्तीला काय म्हणायचे असा संतप्त सवाल सामान्यजनांकडून उपस्थित केला जात आहे.