Pune : शुक्रवार पेठ व लोहगाव येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कमी झालेल्या सोनसाखळी चोऱ्या अन धमकावून लूटमारीच्या घटना पुन्हा एकदा सुरू झाल्या असून, या चोरट्यांनी हैदोस घातला आहे. शुक्रवार पेठ व लोहगाव येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले आहेत. तर, उत्तमनगर भागात दुकान फोडण्याची धमकी देऊन २४ हजारांचा माल जबरदस्तीने नेला असून, डेक्कनला तरुणाच्या हातामधील मोबाईल हिसकाविला.

याप्रकरणी शुक्रवार पेठेत राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या प्रेस्टीज पॉईन्ट येथे मंगळवारी सकाळी फिरण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून दोन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किंमतीची सोन्याचे गंठण हिसकावून नेले. त्यांनी आरडा-ओरडा केला. पण, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.

लोहगाव निंबाळकर नगर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकविले. पण, महिलेने त्यांना प्रतिकार करून साखळई सोडली नाही. त्यामुळे आरोपींनी त्यांना दगडाने जबर मारहाण केली. महिलेने प्रतिकार सुरूच ठेवल्यामुळे चोरटे पसार झाले. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर डेक्कन जिमखाना गेटजवळ तनय पगार ऋषीपाठक (रा. सिम्बॉयोसिस बॉईज हॉस्टेल, सेनापती बापट रस्ता) याचा मोबाईल हिसकवला आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला. तनय हा डेक्कन जीमखाना गेटजवळ उभा असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातामधील मोबाईल हिसकावून नेला.

दुकानात घुसून लुटले
उत्तमनगर परिसरात एका दुकानात शिरून सराईत गुन्हेगारांने मोबाईल व इतर वस्तू असा २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयदीप सुनिल काटे (वय २१, रा. रायकड मळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सराईत गुन्हेगार झेवरीवर पॉल कॉलवीन याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उत्तमनगर पोलिस करत आहे.