पोलिस असल्याची बतावणी करुन तरुणाला लुटले, दोघे जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पोलिस असल्याची बतावणी करुन तरुणाला काठीने मारहाण करीत साडेतीन हजारांच्या रोकडसह मोबाईल लुटण्यात आल्याची घटना चतुःश्रुगीत घडली. पोलिसांनी दोघांना पकडले आहे. शनिवारी रात्री वडारवाडीतील गोलंदाज चौकात ही घटना घडली.

पृथ्वीराज संदीप मुळिक (वय २३, रा. कात्रज) आणि पुष्कर रवींद्र कुलकर्णी (वय २२, रा. भारती विद्यापीठ चौक, कात्रज ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सदाशिव गंगानवर (वय २४, जुनी वडारवाडी ) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपुर्वी सदाशिव आणि त्यांचा मित्र मोहन एकबोटे वडारवाडीतील गोलंदाज चौकात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या पृथ्वीराज आणि पुष्करने त्यांना पोलिस असल्याची बतावणी केली. त्यानंतर दोघांनी सदाशिवला काठीने मारहाण करीत खिशातील ३ हजार ६०० रुपयांची रोकड आणि मोबाईल चोरुन नेला होता. अधिक तपास उपनिरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.