Lockdwon मध्ये नोकरी गेली, पुण्यातील महिला कौन्सिलर बनली चोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे अनेक उद्योगधंदे बंद झाले तर काही कंपन्यांनी नोकर कपात केली. याचा परिणाम अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. परंतु अशा कठीण काळात न डगमगता काहीजण मिळेल ते काम करून कुटुंबाचा आर्थिक भार उचलत आहेत. दुसरीकडे काहींनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लॉकडाऊनमुळे खासगी कंपनी काम करणाऱ्या एका महिला कौन्सिलरची नोकरी गेली. त्यामुळे या महिलेने चोरीचा मार्ग अवलंबला आणि आता तिला तुरुंगात जावे लागलं आहे. एका ज्वेलर्सच्या दुकानात या महिलेने चोरी केली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली असून तिचं नांव स्नेहल वसंत पाटील असं आहे. ती एका कंपनीत कौन्सिलर या पदावर काम करत होती. देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.

यामध्ये स्नेहल पाटीलची देखील नोकरी गेली. ती बेरोजगार झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, स्नेहलने पहिल्यांदाच चोरी केली नाही. तर यापूर्वी 2015 आणि 2018 मध्य तिनं चोरी केली होती. या घटनांमध्ये ती सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिच्यासोबतचे संबध तोडले होते. चंदननगर मधील ज्वेलर्सचे मालक राहुल अरुण लोळगे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. कोरेगाव पार्कमधील एका उच्चभ्रू सोसायटीतून स्नेहल पाटीलला पोलिसांनी अटक केली. ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत या ठिकाणी रहात होती. तिचा बॉयफ्रेंड चित्रपट निर्माता असल्याचे सांगण्यात येते. या चोरीच्या घटनेबाबत त्याला काहीही माहिती नव्हते. कारण घटना घडली त्यावेळी तो मध्य प्रदेशात आपल्या कुटुंबासोबत होता. चोरीची ही घटना 28 जुलै रोजी सायंकाळी घडली होती.

स्नेहल ही ज्वेलर्सच्या दुकानात आली. तिने कानातील सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगून बराचवेळ दुकानात होती. ज्वेलर्सचे लक्ष नसल्याचे पाहून तिने साठ हजार रुपयाचे दागिने चोरून पळून गेली. दुकान बंद करताना तक्रादारानं दुकानातील दागिने पाहिले असता त्यातील कानातील दागिने गायब असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा शोध सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव हे करत होता. ही महिला ज्यावेळी दुकानात आली त्यावेळी तिने मास्क घातल्याने तिचा पूर्ण चेहरा झाकलेला होता. त्यामुळे तीचा चेहरा सीसीटीव्हीत दिसत नव्हता. त्यामुळे ती ज्या रिक्षातून दुकानात आली होती. ती रिक्षा पोलिसांनी शोधून काढील. रिक्षा चालकाने केलेल्या वर्णानावरून स्नेहलची ओळख पटली, अशी माहिती जाधव यांनी दिली. तसेच तिने 2015 मध्ये चंदननगर आणि 2018 मध्ये बाणेरमध्ये चोरी केल्याची माहिती त्यांनी दिली. तिने आणखी कुठे चोरी केली आहे का याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like