‘त्या’ व्यंगचित्राप्रकरणी उध्दव ठाकरेंसह चौघांना कोर्टाचे वारंट

पुसद : पोलीसनामा ऑनलाईन – ऐन निवडणूकीच्या धामधुमीत शिवसेने समोरच्या अचडणीत वाढ झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाबद्दल ‘सामना’ वर्तमानपत्रात वादग्रस्त व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी दाखल खटल्यात सुनावणीला हजर राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतरही हजर न राहिल्याने पुसद न्‍यायालयाने सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍यासह व्‍यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्‍याविरुद्ध वॉरंट जारी केले आहेत.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाने मुक मोर्चा काढला होता. त्यावर भाष्य करणारे एक वादग्रस्त व्यंगचित्र शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून छापून आलं होतं. यावर राज्यभरात पडसाद उमटले होते. या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार एड. दत्ता सुर्यवंशी यांनी पुसद न्यायालयात २७ सप्टेबर २०१६ रोजी केली होती.

याप्रकरणी न्यायालयाने साक्षीदार तपासले. त्यावेळी प्रथमदर्शनी गुन्हा केल्याचे आढळून आले. त्यानंतर न्यायालयाने सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राजेंद्र भागवत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांना न्यायालयाने हजर राहण्याचे समन्स बजावले होते.

मात्र ते मागील तारखेवर ते समन्स बजावूनही न्यायालयात सुनावणीला गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात पुसद न्यायालयाने जामीनपात्र वारंट जारी केले आहेत.