मुंबईत विमानाने येणार्‍या प्रत्येकाला ‘क्वारंटाईन’ बंधनकारक : महापौर

पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत विमानाने दाखल होणार्‍या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवस क्वारंटाईन राहावेच लागेल. सर्वासाठी नियम समान आहे. त्यातून सूट हवी असल्यास सरकारी अधिकार्‍यांनी अर्ज करावा, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याला विलगीकरणात ठेवण्यात आल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनावर तोफ डागली होती. यासंदर्भात पेडणेकर म्हणाल्या की, पालिकेने जारी केलेल्या सुधारित नियमानुसार विमानाने मुंबईत येणार्‍यांना सक्तीने विलगीकरणात ठेवावे लागणार आहे. या प्रवाशांना पालिकेने सुविधा उपलब्ध केलेल्या ठिकाणी किंवा स्वत:च्या घरी 14 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. विलगीकरणाच्या नियमातून सरकारी अधिकार्‍यांना सूट हवी असल्यास दोन दिवस आधी अर्ज करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढल्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विमानाने येणार्‍यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.