ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! मराठवाडा-विदर्भातील विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाडा आणि विदर्भातील लाखो विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाचा 70:30 कोटा पद्धत अखेर रद्द करण्यात आली असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे.

भाजप सेना युती सरकारच्या काळात वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण लागू असताना, पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची जाचक अट लावण्यात आली होती. त्यामुळे मराठवाडा विभागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप होत होता.

मराठवाड्यात 6 आणि विदर्भात 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. अशावेळी 70:30 कोटा निर्माण करुन प्रादेशिक आरक्षण लागू झाल्याने याचा फटका वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खासकरून मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना बसत होता. या पार्श्वभूमीवर सरकारने या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरणाऱ्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70:30 कोटा पद्धती रद्द करत अनेक वर्षांच्या या मागणीला हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही घेण्यात आली होती. त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, आज याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.