‘त्या दिवशी मोदी सरळ तुरुंगात जातील’

इंदाैर : वृत्तसंस्था – ज्या दिवशी तपास सुरू होईल त्या दिवशी मोदी तुरुंगात जातील असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डील मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. ज्या दिवशी राफेल विमान कराराची चौकशी होईल त्या दिवशी नरेंद्र मोदी सरळ तुरुंगात जातील, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. इतकेच नाही तर मोदींना केवळ भ्रष्ट म्हटले जात नाही तर ते खरोखरच भ्रष्ट आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारचे किंतु परंतु असता कामा नयेत असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल प्रकरणी  टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ”राफेल विमान करार हे भ्रष्टाचाराचे खुले प्रकरण आहे. ज्या दिवशी या प्रकरणाची चौकशी सुरू होईल, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुरुंगात कधी पाठवायचे एवढाच प्रश्न बाकी राहील. दरम्यान, राफेल विमान कराराची फ्रान्समध्ये चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. मोदींनी या करारामधून आपले मित्र अनिल अंबानीं यांना फायदा मिळवून देण्यासाठी नियम आणि कायद्यांचा भंग केला आहे. याशिवायही अनेक प्रकरणे आहेत. जी राफेल विमान करारापेक्षाही मोठी आहेत.”

सबरीमाला मंदिर प्रकरणाबाबतीत भूमिका ?

सबरीमाला मंदिर प्रकरणाबाबत मात्र राहुल गांधी यांनी वेगळी भूमिका घेतली. केरळमध्ये माझ्या पक्षाची भूमिका तेथील महिला आणि पुरुषांच्या भावनात्मक मुद्याप्रमाणे आहे. मात्र या प्रकरणी माझं वैयक्तिक मत वेगळं आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच मी प्रत्येक वर्गाचा नेता असून, हिंदू धर्माची माझी समज भाजपावाल्यांपेक्षा अधिक आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.