‘राफेलमुळं संपूर्ण क्षेत्रात भारताचा दबदबा असेल’, फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं

अंबाला : वृत्तसंस्था –   राफेल लढाऊ विमानांमुळं भारताच्या सुरक्षेला धार येईल असं वक्तव्य फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी गुरुवारी केलं आहे. गुरुवारी राफेल लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समावेश झाला. भारतीय हवाई दलात 5 राफेल लढाई विमानांचा समावेश करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना पार्ली म्हणाल्या, “भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश संरक्षणासंदर्भात एक नवीन अध्याय लिहत आहेत. भारताला 36 राफेल विमानांचा पुरवठा करण्याच्या या योजनेचे अनेक अर्थ आहेत” असं पार्ली म्हणाल्या आहेत.

पुढे बोलताना पार्ली म्हणाल्या, “सैन्याच्या दृष्टीनं पाहता भारत जागतिक स्तरावरील क्षमता साध्य करेल असा याचा अर्थ आहे. भारत खरोखरंच जगातील सर्वाधिक शक्तीशाली देशांपैकी एक असेल आणि हवाई दलाला अविश्वसनीय असं शस्त्र मिळेल. सामरिक संदर्भातून पाहिल्यास भारताला आपली आणि आपल्या जनतेचं रक्षण करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रात धार मिळेल” असं पार्ली यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पार्ली म्हणाल्या, “राफेल म्हणजे वादळ किंवा आगीचा लोळ. या दोघांचा अर्थ अविश्वसनीय क्षमता व्यक्त करणारा आहे. हे दोन्ही देशातील दृढ संबंधांचे प्रतिक आहे. भारताच्या मेक इन इंडिया योजनेला फ्रान्सचा पाठिंबा आहे” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

पार्ली असंही म्हणाल्या, “मेक इन इंडिया उपक्रमांसह भारतीय उत्पादकांना आमच्या जागतिक पुरवठा साखळीत एकीकृत करण्यासाठी आम्ही पूर्ण वचनबद्ध आहोत. मेक इन इंडिया हे बऱ्याच वर्षांपासून फ्रान्सच्या उद्योगांसाठी महत्त्वाचं आहे. आता अनेक फ्रेंच कंपन्या आणि त्यांची डिझाईन कार्यालये भारतात स्थापन करण्यात आली आहेत. आता आशा आहे की, इतर कंपन्याही आपलं समर्थन आणि सेवा देण्यासाठी पुढं येतील.”