चीनला मोठा झटका ! रेल्वेनं घेतला मोठा निर्णय, ‘ड्रॅगन’च्या फर्मसोबतचं 471 कोटी रूपयांचं ‘कंत्राट’ केलं रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत-चीनमधील सीमा विवाद आणि तणावादरम्यान सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. रेल्वे उपक्रम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन लिमिटेडने चीनी कंपनी बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिझाइन इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल अँड कम्युनिकेशन कंपनी लिमिटेडबरोबर चालू असलेला करार रद्द केला आहे. वास्तविक या चिनी कंपनीला कानपूर ते दीनदयाल उपाध्याय रेल्वे विभाग दरम्यान ४१७ किमी विभागातील सिग्नलिंग व टेलिकॉमचे काम देण्यात आले होते. हे काम ४७१ कोटी रुपयांचे होते. जून २०१६ मध्ये हे काम या चिनी कंपनीला कराराअंतर्गत देण्यात आले होते. पण रेल्वेच्या म्हणण्यानुसार, कंत्राट देण्याच्या ४ वर्षानंतरही केवळ २० टक्केच काम चिनी कंपनी करू शकली होती. हे काम खूप संथगतीने चालले होते.

काल १७ जून रोजी पंतप्रधान मोदींनी चीनला इशारा देत म्हटले होते की, चीनच्या फसवणूकीची आणि भ्याडपणाची किंमत त्यांना चुकवावी लागेल. यानंतर सर्वप्रथम संचार मंत्रालयाने चिनी कंपनीच्या संप्रेषणाशी संबंधित उपकरणांचा वापर करण्यास न केवळ बंदी घातली, तर चिनी कंपनीला मिळालेल्या निविदा देखील रद्द करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय खासगी सेवा पुरवठा करणाऱ्यांना देखील चिनी उपकरणे वापरातून काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. दोन चिनी कंपन्यांना विशेष लक्ष्य केले गेले. यामागील कारण म्हणजे या कंपन्यांमार्फत डेटा चोरी आणि हेरगिरीचा आरोप असल्याचेही मानले जात आहे.

आता रेल्वेनेही चिनी कंपनीसह ४७१ कोटींचे कंत्राट रद्द केले आहे. रेल्वेच्या या पावलाला भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाशी जोडले जात आहे. काम अत्यंत संथ गतीने चालू होते. कॉर्पोरेशनकडून उत्तर मागितल्यावर समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. यावर रेल्वेने मोठी कारवाई करत चिनी कंपनीचे कंत्राट रद्द केले आहे. मात्र रेल्वेने हे कंत्राट रद्द करण्यामागे चिनी कंपनीच्या निष्काळजी वृत्तीचे कारण असल्याचे सांगितले आहे.-