50 दिवसानंतर धावणार रेल्वे ! कसं मिळणार तिकीट, भाड किती असणार, ‘इथं’ वाचा सर्व प्रश्नांची उत्तर

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. पण ५० दिवस थांबल्यानंतर सरकारने पुन्हा एकदा प्रवासी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून यापूर्वी केवळ मालगाड्या व कामगार विशेष गाड्या धावत होत्या. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार असून अशात रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी अनेक अटी व नियम बनवण्यात आले आहेत. जाणून घेऊया या गाड्यांचे बुकिंग आणि भाडे किती असेल ते…

१२ मेपासून देशातील प्रत्येक शहरात रेल्वे धावणार नाहीत. सुरुवातीला १५ गाड्या (अप-डाऊन सहित ३० गाड्या) चालवण्याची योजना असून त्यांना स्पेशल ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. नंतर गाड्यांची संख्या वाढवली जाऊ शकते.

या सुरुवातीच्या १५ गाड्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून धावतील. नवी दिल्लीहून या गाड्या दिब्रूगड, अगरतला, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतवीसाठी धावतील.

या गाड्यांमध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्हाला IRCTC च्या वेबसाइटवरून रिजर्वेशन करावे लागेल. ११ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता रिजर्वेशनसाठी बुकिंग सुरू होईल. लक्षात ठेवा स्टेशनवर काउंटरवरून तिकिट मिळणार नाही. प्रवासासाठी तुम्हाला IRCTC वरून ऑनलाईन बुकिंग करावे लागेल.

फक्त कन्फर्म तिकीटवालेच प्रवास करू शकतात. याशिवाय सर्व प्रवाशांची स्क्रीनिंग टेस्ट देखील केली जाईल. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही.

रेल्वेने म्हटले आहे की, सध्या कोणत्याही श्रेणीतील प्रवाशांना भाड्यात कोणतीही सूट मिळणार नाही. या गाड्यांचे भाडे राजधानी एक्स्प्रेसच्या बरोबरीचे असेल. म्हणजेच सर्व कोच एसी असतील.