लोकसभेचा निकाल राज ठाकरेंसाठी ‘अनाकलनीय’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सतराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून मतमोजणी चालू आहे. या निकालांचे आतापर्यंतचे जे आकडे समोर आले आहेत त्यानुसार देशात एकदा पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. देशात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकड्यांनुसार, देशात भाजपला ३०० च्यावर जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेस प्रणित यूपीएने अद्याप १०० चा आकडाही गाठलेला नाही. या निकालाविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ एकाच शब्दात ‘ही प्रतिक्रिया दिलेली आहे. निवडणुकांचे निकाल ‘अनाकलनीय’ आहेत असे राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभेच्या मैदानात उतरला नव्हता मात्र त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात अनेक प्रचारसभा घेतल्या होत्या. राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या दहापैकी ८ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे राज यांच्या सभांना गर्दी करणाऱ्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रचार सभांना प्रचंड गर्दीही झाली. मात्र विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच यंदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या गर्दीचे परिवर्तन मतांमध्ये झाले नाही. राज यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र याचा फारसा उपयोग झाला नाही.