‘अनाकलनीय’ या एका शब्दात राज ठाकरेंकडून निकालाचे विश्लेषण

मुंबई : वृत्तसंस्था – ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ असं म्हणत मोदी – शहा मुक्त भारत करण्यासाठी स्वतःचे उमेदवार न उतरविता लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या समीकरणासाठी प्रचार करणाऱ्या मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना लोकसभेच्या निकालाचा शॉक बसला आहे. अनाकलनीय या एका शब्दात राज ठाकरे यांनी निवडणूक निकालाचे विश्लेषण केले आहे.

२०१४ पाठोपाठ २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्षांची धडाकेबाज कामगिरी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यंदा ३०० चा आकडा पार करत भाजपने पर्यायाने मोदींनी नवा विक्रम केला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने आपले उमेदवार रिंगणात न उतरविता, मोदींविरोधात महाराष्ट्रात आठ ठिकाणी सभा घेत विरोधाचे वातावरण तयार केले होते. राज यांच्या प्रचार सभांना चांगली प्रसिद्धी मिळाली होती. ‘ए लाव रे तो व्हिडीओ ‘हा राज ठाकरे यांचा फार्मुला गाजला होता, मात्र आता निकालानंतर ठाकरेच ट्रोल झाले आहेत. निवडणुकांच्या निकालाचे विश्लेषण करताना अनाकलनीय या एका शब्दात विश्लेषण केले आहे.