अखेर सचिन पायलट यांच्याबद्दल काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जयपूर : वृत्तसंस्था – देशात सत्तेतून बाहेर असलेल्या काँग्रेसला सध्या एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सत्ता बंडखोरीमुळे गमवावी लागल्यानंतर सध्या काँग्रेससमोर राज्यस्थानातील सत्ता टिकवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच आता राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे गेहलोत सरकारच्या स्थिरतेचा धोका निर्माण झाला आहे. सध्या राजस्थानमध्ये सत्ता संघर्ष तिव्र होताना दिसत असून याला आज नवे वळण लागले आहे.

राजस्थानचे उपमुख्यमुंत्री सचिन पायलट हे आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम आहेत. त्यामुळे आता काँग्रेसकडून मनधरणीचे प्रयत्न थांबवण्यात आले आहेत. काँग्रेसकडून सचिन पायलट यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात काँग्रेसमध्ये अनेक घडामोडींना वेग आला. सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी राहुल गांधी यांच्यापासून ते अहमद पटेल यां सर्वांनी प्रयत्न केले. मात्र, सचिन पायलट हे अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून होत असलेले मनधरणीचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.

दरम्यान, सचिन पायलट यांनी पक्षाकडे शेवटची मागणी केली आहे. गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदावरून कधी हटवणार आणि आपल्याला कधी मुख्यमंत्री करणार असं आश्वासन तरी पक्षाने द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, पक्षाने त्यांना सीएलपीच्या बैठकिला जाण्याचा सल्ला दिला. तसेच या बैठकीनंतर गेहलोत यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे आश्वासन पायलट यांना दिलं. पण पायलट यांनी बैठकीला जाण्यास नकार दिल्याने त्यांच्या विरोधात निर्णायक कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यांना आज शिस्तभंग केल्याची नोटीस बजावली जाणार आहे.

दरम्यान, जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक सुरु आहे. या बैठकीला 102 आमदार उपस्थित असून त्यांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी केल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. बंडखोर सचिन पायलट आणि बैठकिला अनुपस्थित असलेल्या अन्य आमदारांवर कारवाई करण्याचा ठराव काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत करण्यात आल्याचेही वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.