लोकसभा २०१९ : पालघरचा तिढा सुटला ! शिवबंधन बांधून राजेंद्र गावित यांच्यावर शिक्कमोर्तब

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभेसाठी पालघर मतदार संघातून कोणाला उमेदवारी देण्यात येणार याबाबत राज्यभरात चर्चा रंगल्या असताना ही जागा भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना देण्यात आली आहे. राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. पालघर लोकसभा जागेवर येत्या २४ तासात निर्णय घेणार अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली होती. याबाबत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. हा निर्णय युतीचा आहे असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

श्रीनिवास वनगा यांची स्वतःहुन माघार

यावेळी बोलताना वनगा म्हणाले ,”लोकसभा निवडणूक मी स्वतःहुन न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी खासदारकीसाठी नाही तर आमदारकीसाठी उभा राहणार आहे. असे स्पष्ट केले. तसेच त्यांना कोणत्याही परिस्थितीत विधिमंडळात पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

पालघरचा तिढा सुटला

गेल्या तीन दिवसांपासून भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे ब.वि.आ.च्या तिकीटावर रिंगणात असतील अशी चर्चा रंगली होत्या. तर सोमवारी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीनिवास वनगा यानी माघार घेतल्यानंतर गावित यांना सेनेच्या तिकीटावर उभे करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुखानी घेतला. दरम्यान, आज सकाळी राजेंद्र गावित मातोश्रीवर दाखल झाले आणि दोन नंतर पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली.

पालघरमध्ये सातारा पॅटर्न

लोकसभा निवडणूकीत साताऱ्यातील लोकसभा जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपकडून तिकीट देण्यात आले अशीच परिस्थिती पालघर लोकसभा मतदार संघात होणार असे दिसते आहे. भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांना शिवसेना नरेंद्र पाटीलांप्रमाणे दत्तक घेणार असून जागा जरी शिवसेनेच्या वाटेला आली असली तरी उमेदवार मात्र भाजपचा असणार आहे अशी माहिती शिवसेनेच्या नेत्याने दिली होती.