काँग्रेसला धक्का ! राजेश देशमुखांचा भाजपमध्ये प्रवेश

परळी : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख आणि आता अमित देशमुख यांचे विश्वासू राजेश भाऊसाहेब देशमुख यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत देशमुख यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला. एवढेच नाही तर भाजप मध्ये प्रवेश करताच देशमुख यांची थेट भाजप महाराष्ट्र प्रदेश ‘चिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख भाजपमध्ये प्रवेश करताच भाजपला नावा स्टार प्रचारक मिळाला आहे.

राजेश देशमुख यांचे आणि स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे अत्यंत निकटचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. राजेश देशमुख यांनी आपल्या भागात अनेक सामाजिक कार्यात भाग घेतला आहे. एवढेच नाही तर त्यांना मानणारा एक वर्ग आहे. आता आगामी निवडणुकीसाठी देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे मात्र त्यांच्या कार्याचा फायदा भाजप पक्षाला प्रचारासाठी होणार आहे. धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक अशा विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राजेश देशमुख यांच्या प्रवेशामुळे भाजपला बळकटी मिळणार असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. यशःश्री या निवासस्थानी आज देशमुख यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.