Exit Poll 2019 हातकणंगलेत राजू शेट्टी लोकसभेचा ‘सिक्सर’ ठोकणार ?

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांचे निकाल येत्या २३ तारखेला जाहीर होणार आहेत. अनेक माध्यमांनी एक्झिट पोलवरून निकालाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जनतेचा कौल भाजपाकडे असल्याचे दिसून येत आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी आपल्या ‘बॅट’ या चिन्हाने लोकसभेच्या निवडणूकीचा सिक्सर मारणार असे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोठा प्रभाव पहायला मिळतो. या भागातील ऊस उत्पादक शेतकरी राजू शेट्टींच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. या मतदार संघात शेट्टी यांनी आंदोलनातुन निर्माण केलेली शतकऱ्यांची ताकद तसेच संघटनात्मक जाळे या माध्यमातुन त्यांनी या मतदार संघावर आपली पकड मजबूत केली आहे. या मतदार संघात स्वभिमानी शेतकरी संघटनेकडून राजु शेट्टी तर त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने लोकसभेच्या रिंगणात आहेत. या मतदार संघात शेट्टींचे पारडे जड असले तरी तरुण नेतृत्व म्हणून धैर्यशील माने त्यांना तगडी टक्कर देणार असल्याची चर्चा आहे.

शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे शेट्टींचे पारडे जड

एकीकडे शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते म्हणून राजू शेट्टी यांचे नाव आहे. दुधाला दर मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभरात तीव्र आंदोलन केले होते. यंदाच्या निवडणुकीत शेतकरी वर्गाचा पाठिंबा शेट्टींना मिळणार असे बोलले जात आहे. पण २०१४ साली राजु शेट्टी हे भाजप शिवसेना युतीकडून लढले होते.जिंकल्यानंतर काही दिवसात त्यांचे केंद्रातील मोदी सरकारशी बिनसले. मोदी यांची धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा हल्लाबोल शेट्टी यांनी चालू केला. त्यामुळे भाजप सेनेच्या समर्थकांची मते ही शिवसेनेलाच मिळतील असे बोलले जात आहे.

सदाभाऊ खोत यांनी ऐन वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ सोडली. एव्हढेच नाही तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या विरोधात उघड उघड प्रचार केला. तसेच शिवसेनेला मत देण्याचे आवाहन त्यांनी प्रचार सभांमधून केले. त्यांच्या भाषणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील करण्यात आले होते. त्यामुळे काही मतं ही राजू शेट्टींच्या विरोधात गेली असल्याचे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.

कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमीचा फायदा होणार ?

धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने या पूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार होत्या. गेल्या वर्षी धैर्यशील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एक तरुण नेतृत्व म्हणून धैर्यशील माने यांच्या नावाचा विचार केला जात आहे. धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने यांच्या नावाचे प्रस्थ हातकणंगले आणि परिसरात आहे. त्यामुळे त्याचा फायदा धैर्यशील माने यांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो असे बोलले जात आहे. दरम्यान २००९ मध्ये शेट्टी यांनीच धैर्यशील यांच्या मातोश्री निवेदिता माने यांना पराभवाची धुळ चारली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघात चुरस रंगणार आहे.