रामदास आठवलेंच्या कवितांनी संसदेत ‘रंगत’, उपराष्ट्रपती नायडू म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु होती. सभागृहात गंभीर चर्चा सुरु असताना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत भाषणाला सुरुवात केली. आठवले यांनी चर्चेत सहभाग घेत सीएएचं समर्थन केलेच याशिवाय त्यांनी सादर केलेल्या खुसखुशीत कवितांनी सर्वांना पोटधरून हसायला लावले. आठवले यांच्या कवितांमध्ये सभागृहातील धीरगंभीर वातावरण काही वेळासाठी निवळले. त्यांच्या भाषणानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी धन्यवाद म्हणत आठवलेंचे आभार मानले.

बहुत ही अच्छा था महामहिम रामनाथ कोविंद का अभिभाषण, बहुत ही अच्छा था महामहिम का अभिभाषण, क्योंकि नरेंद्र मोदी मजबूत कर रहे है भारत नेशन ! असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी त्यांच्या कवितेतून काँग्रेसवरही टीका केली. गुलाम नबी आजाद जी, आनंद शर्मा जी, अब मत लाओ उल्टा सीधा मोशन, अब जरा शांति से सुनो मेरा भाषण, या कवितेवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील दिलखुलास हसत दाद दिली.

आठवले पुढे म्हणाले, मोदींना समाज तोडण्याची सवय नाही तर समाज जोडणारे ते नेते आहेत. या कायद्यामुळे कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. ज्या लोकांना नागरिकत्वाची गरज आहे, त्यांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे. हा कायदा चांगला आहे. त्याचे तुम्ही समर्थन केले पाहिजे. तुम्ही चांगल्या कायद्याला पाठिंबा दिला नाही तर तुम्ही विरोधात बसाल, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांच्यावर कवीतेतून टीका केली. राष्ट्रपती जी का भाषण सुना, अच्छा था, आनंद जी का भी अच्छा था, हमारे विरोध में आप बहुत अच्छा बोलते है, बाद में हमलोग सब आपकी पोल खोलते हे, असे म्हणताच शर्मा यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

आठवले यांनी आपल्या भाषणातून सादर केलेल्या कवितांना सभागृहातील सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली. दरम्यान, आठवलेंच्या भाषणामुळे संसदेतील वातावरण हलकंफुलकं झाल्याने राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी तुम्ही चांगलं मनोरंजन केलं. त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असे म्हणत आठवलेंचे आभार मानले.