रक्षाबंधनाचा सण जवळ आला असतानाच भावानं तोडलं नातं, बहिणीचा गळा दाबून तिला संपवलं

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन –   बुलढाणा जिल्ह्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रक्षाबंधनाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. बुलढाणा शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटीमध्ये सख्या भावानेच आपल्या बहिणीला बेदम मारहाण करून तिचा गाळा आवळून खून केला. ही घटना आज (बुधवारी) सकाळी घडली आहे.

विदर्भ हाउसिंग सोसायटीमध्ये आरोपी सागर शर्मा हा आपली बहिण अंकिता शर्मासोबत रहात होता. आज सकाळी त्याने बहिणीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर रागाच्या भरात गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला असून पोलीस शेजाऱ्यांकडे चौकशी करत आहेत.

आरोपी सागर याने बहिणीचा खून कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. खून का केला याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपी सागर शर्मा हा सराईत गुन्हेगार आहे. बहिणीचा खून केल्यानंतर त्याने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सरु केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.