राम मंदिर आमच्यासाठी श्रद्धेचा आणि भक्तीचा, शिवसेनेच्या नेत्याने स्पष्ट केली भूमिका

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अयोध्येत येत्या तीन दिवसांत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यावरून राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. भाजपने निमंत्रणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ’राम मंदिर हा सेनेसाठी श्रद्धेचा विषय आहे’ असे म्हणत भाजपवर पलटवार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा 5 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याला 200 निमंत्रितांना बोलवण्यात आले आहे. त्यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. परंतु, भाजप पाठोपाठ विहिंपने उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. एवढंच नाहीतर उद्धव ठाकरेंनी भूमिपूजन सोहळ्याला येऊ नये, असेही म्हटले होते.

विहिंपच्या भूमिकेचा समाचार घेत एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. ’शिवसेनेसाठी राम मंदिर हा राजकारणाचा नव्हे तर श्रद्धा, अस्मिता आणि भक्तीचा विषय आहे. ’जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही अयोध्येला गेले होते, त्यामुळे हा श्रद्धेचा आणि भक्तीचा प्रश्न आहे’, अशी आठवण करून शिंदेंनी टोला लगावला आहे.