कौतुकास्पद ! 87 व्या वर्षी सायकल चालवत अनवाणी दारोदारी फिरून देतात मोफत रुग्णसेवा

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आज आपण अशा एका कोरोना योद्ध्याबद्दल (Corona Warrior) माहिती घेणार आहेत जी वाचल्यानंतर तुमच्याही मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल. असे एक आजोबा आहेत जे या महासंकटातही अविरतपणे मोफत सेवा देत आहेत. कौतुकास्पद बाब अशी की, गेल्या 60 वर्षांपासून ते सायकलवर फिरून गरजू रुग्णांना मोफत सेवा देत आहेत. 10 किमी सायकल चालवत तेही अनवाणी फिरून ते स्वत:च्या वयाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देत आहेत.

या देवमाणसाचं नाव डॉ. रामचंद्र दांडेकर (Dr Ramchandra Dandekar) आहे. त्यांच वय 87 वर्षे आहे. डॉ. दांडेकर महारष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 60 वर्षांपासून काम करत आहेत. ते मुळात होमिओपॅथीचे (Homeopathy) डॉक्टर आहेत. त्यांनी मनात आणलं असतं तर कुठल्याही शहरात आरामात प्रॅक्टीस करून सुखी आयुष्य जगू शकले असते. परंतु खऱ्या रुग्णसेवेत त्यांचं सुख होतं असंच काहीसं म्हणावं लागेल.

डॉक्टरांनी तरुणपणीच ठरवलं होतं की, चंद्रपुरातल्या मूळ, पोम्भुर्णा आणि बल्लारशा या 3 तालुक्यांमधील दुर्गम गावांपर्यंत, तिथल्या घराघरापर्यंत वैद्यकीय उपचार पोहोचायला हवे आणि त्यासाठी आपल्या शिक्षणाचा खरा उपयोग करायचा. या तीन तालुक्यात अशा पद्धतीनं गेली 60 वर्षे ते रुग्ण सेवा करत आहेत. कोरोनाच्या (Covid-19) काळात वयाची साठी ओलांडलेल्या लोकांनी बाहेर पडू नये अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. वयानं ज्येष्ठ असलेल्या डॉक्टरांनाही शक्यतो या काळात संपर्क टाळायला सांगितलं जात आहे. असं असताना दांडेकर मात्र थांबलेले नाहीत.

डॉ दांडेकर यांनी PTI सोबत बोलताना सांगितलं की, थांबून कसं चालेल ? मी माझ्या दैनंदिन कामात खंड पडू दिलेला नाही. खेड्यापाड्यात रुग्णांना कोण औषधं पुरवणार. मी अजूनही 10 किमी सायकल चालवतो आणि घराघरात जाऊन रुग्ण तपासून औषधं देतो.

खास बाब अशी की, दांडेकर हे अनवाणीच जातात. स्वत: सायकल चालवत ते रुग्णापर्यंत पोहोचतात आणि गरजू व्यक्तींकडून कुठलेही पैसे घेत नाहीत. गरजूंना मोफत तपासून औषधही देतात. होमिओपॅथीसोबतच ते आयुर्वेदीक औषधंही देतात. त्यांच्या औषधांनी गुण येतो असंही स्थानिकांचं म्हणणं आहे.