औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरुन आठवलेंचा काही वेळातच ‘यू-टर्न’, आधी विरोध नंतर माघार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  औरंगाबादच्या नामांतरचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने केली असून याला काँग्रेसने विरोध केला आहे. नामांतरावरून काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद समोर आल्याने भाजपच्या हाती आयतं कोलीत मिळालं. या मुद्यावरुन भाजप शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला जात असताना भाजपसोबत असलेल्या आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी या मागणीला विरोध करणारे ट्विट केले. रामदास आठवले यांनी केलेल्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली असताना काही वेळातच रामदास आठवले यांनी ते ट्विट आपल्या ट्विटरवरुन डिलीट करत नामांतराच्या मुद्यावर पडदा टाकला.

येत्या काळात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर शहराचे नाव बदलण्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेसने याला विरोध केला आहे. यावरुन भाजपाने शिवसेनेवर शरसंधान साधले असून निवडणुकीपुरतीच शिवसेना ही भूमिका घेत असल्याचा आरोप करत आत्ताही असचं सुरु असल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान, औरंगाबादचे नाव तेच राहायला हवं. कुणीही ते नाव बदलण्याचा प्रयत्न करु नये. वर्षानुवर्षे हेच नाव प्रचलित आहे, तेच राहिले पाहिजे. कुणी नाव बदलण्याचा प्रयत्न केला तर आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आठवले यांनी ट्विट करुन दिला होता. भाजपच्या मागणीविरोधात भूमिका घेतल्याने नवा राजकीय ट्वीस्ट निर्माण झाला होता. मात्र काही वेळातच रामदास आठवले यांनी आपलं ट्विट डिलीट केलं. यावरुन आधी विरोध केला नंतर पळ काढल्याची चर्चा रंगू लागली आहे.