राम मंदिर : तब्बल 27 वर्षंपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या मोहम्मद शरीफ यांना भूमिपूजनाचं निमंत्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असून यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये 27 वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

मोहम्मद शरीफ बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करतात. यासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावरही सन्मानित करण्यात आले आहे. ते अयोध्येचे निवासी असून त्यांना आमंत्रित केले असल्याचे राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले. मुलाच्या हत्येनंतर बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करायला त्यांनी सुरुवात केली. गेल्या 27 वर्षांपासून मोहम्मद शरीफ हिंदू-मुस्लिम किंवा अन्य कोणताही धर्म न बघता बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास 25 हजारांहून जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. शरीफ यांचा एक मुलगा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होता. तो सुल्तानपूरमध्ये गेला असताना त्याची हत्या करुन मृतदेह फेकून देण्यात आला. नातेवाईकांनी त्याचा बराच शोध घेतला, पण मृतदेह सापडला नाही. तेव्हापासून शरीफ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. स्थानिक लोकांमध्ये ते ‘शरीफ चाचा’ नावाने ओळखले जातात.