रावसाहेब दानवेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना उत्तर, म्हणाले – ‘राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने दसरा मेळाव्यात माझे नाव घेतले. हे आधी दाऊद, हाजी मस्तान यांचा बाप काढायचे आता त्यांनी माझा बाप काढला. राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत आहे, असे म्हणत भाजपाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना Uddhav Thackeray Governement) प्रत्युत्तर दिले आहे.मी इतकेच म्हणालो की, चोरून संसार तुम्ही करता, पैसे बापाकडे मागता. आता आमच्याकडे कशाला पैसे मागता, तुमचं सरकार म्हणजे तुमची जबाबदारी आहे, असे टीकास्त्रही त्यांनी ठाकरे सरकारवर सोडले आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी उपस्थित असलेल्या दानवेंनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदींसारखी दुसरी मोठी शक्ती नाही, कारण अमेरिकेत ट्रम्प हरू शकतो, पण इकडे मोदी जिंकतात. कारण ही मोठी ताकत आहे. गेल्या वर्षी पाऊस पडला हे मुख्यमंत्री गेले आणि पंचनामे न करता मदत द्या म्हणू लागले. पण यावर्षी ते स्वत: मुख्यमंत्री झाले आणि घराबाहेर निघायलाच तयार नाहीत, लोक ओरडू लागल्यावर ते म्हणाले, तुमचं कुटुंब तुमचे जबाबदारी असे म्हणत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यांच्या जीएसटीच्या पैशांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली होती. राज्य सरकारने केंद्राकडे जीएसटीचे थकलेले पैसे मागण्यात काहीही गैर नाही. आम्ही हे पैसे मागितले तर भाजप नेते टीका करतात. तुम्ही लग्न केले आणि आता बापाकडे पैसे कशाला मागता, असे दानवे म्हणाले होते. मात्र, माझा बाप केंद्रात नाही. तो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो. माझा बाप महाराष्ट्राच हाच आहे, माझ्या विचारातून आणि कृतीतून वेळोवेळी त्याचे अस्तित्व तुम्हाला दिसून येईल, असे ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले होते. दानवेंना मला सांगायचे आहे की, आमच्या लग्नात आलेला आहेर बापाने पळवून नेला. आहेराचे पैसे मोजून परत देतो, असे त्याने सांगितले. मात्र, अजूनही बाप पैसे मोजतच बसलाय, अशी खोचक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला मदत करावी, अशी मागणी मध्यंतरी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केली होती. केंद्राकडून जवळपास 37 हजार कोटी रुपयांचे येणे बाकी, असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.