धोनी खेळतोय तोपर्यंत आनंद लुटा !

मेलबर्न : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील एकदिवसीय मालिका भारताने २-१ ने जिंकत इतिहास रचला आहे. या मालिकेत पाहण्यासारखे एकच होते ते म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची फलंदाजी. भारताच्या ऐतिहासिक विजयात धोनीचा मोलाचा वाटा होता. ३ पैकी दोन सामन्यात त्याने हुकुमी एक्यासारखी फलंदाजी करत भारतासाठी विजयश्री खेचुन आणली. त्यामुळे धोनीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनीचे कौतुक केले आहे. मी अनेकवेळा सचिन तेंडुलकरला रागात किंवा नाराज होताना पाहिलं आहे, मात्र धोनीला कधीच नाही, असं रवी शास्त्रींनी म्हटलं. धोनीसारखा खेळाडू ३०-४० वर्षात एकदा होतो, त्यानंतर त्याची जागा घेणे अशक्य आहे, असं कौतुक त्यांनी केलं.

धोनी आमच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. मी कोणत्याही व्यक्तीला इतकं शांत पाहिलं नाही. मी अनेकवेळा सचिनला नाराज होताना पाहिलं आहे, मात्र धोनीला नाही, असं रवी शास्त्रींनी म्हटलं. धोनीसारखे खेळाडू ३०-४० वर्षातून एकदा येतात. मी भारतीयांना हेच सांगतो, जोपर्यंत धोनी खेळत आहे, तोपर्यंत आनंद लुटा. धोनीने निवृत्ती घेतली तर निर्माण होणारी पोकळी भरुन निघणार नाही, असा सल्लाही त्यांनी धोनीच्या चाहत्यांना दिला आहे.

दरम्यान, या मालिकेत तिन्ही सामन्यात अर्धशतक ठोकत धोनीने मॅन ऑफ द सीरिज म्हणजेच मालिकावीराचा किताब मिळवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ५१ धावा, दुसऱ्या सामन्यात ५५ धावा आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद ८७ धावा केल्या. त्याच्या या निर्णायक खेळीने त्याच्यावर टीका करणाऱ्यांची तोंडं धोनीने बंद केली आहेत.