देशाला मजबूत करणारा अर्थसंकल्प ! : खासदार संजय काकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योग, शेतकरी, करदाते, शिक्षण, समाज कल्याण या दृष्टीकोनातून केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामण यांनी अतिशय योग्य व देशाला मजबूत करणारा अर्थसंकल्प सादर केला आहे.

आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी थोडक्यात व ठळकपणे सांगायचं झालं तर, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास या ध्येयधोरणानुसारच समाजातील प्रत्येक घटकाची काळजी या अर्थसंकल्पात घेतली आहे. देशाचा आर्थिक विकासाचा दर वाढण्यासाठी व उद्योग विकासासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. देशात 100 नवीन विमानतळ बांधले जाणार आहेत. PPP च्या माध्यमातून 150 नवीन रेल्वे येणार आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी 16 कलमी पंतप्रधान किसान योजना राबविण्यात येणार आहे. 100 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष योजना राबविली जाणार आहे. शेती आणि शेतीविषयक कामांसाठी ​2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

देशाचं भवितव्य हे येणाऱ्या नवीन पिढीवर अवलंबून असल्याने ही पिढी अधिक सक्षम बनविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण आणण्याची घोषणा केली गेली. शिक्षणासाठी 99,300 कोटींची तरतूद आणि कौशल्य विकासासाठी 3000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास यानुसार मागासवर्गांसाठी 85,000 कोटी, मागास जमातींसाठी 53,700 कोटी तर, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी 9500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ऊर्जा आणि अपारंपरिक उर्जा स्रोतांसाठी 22,000 कोटींची तरतूद केली आहे. आरोग्यविषयक योजनांसाठी 69 हजार कोटी रुपये तरतूद केली असून 122 जिल्ह्यात आयुषमान हॉस्पिटल्स होणार आहेत.