‘सेट’ आणि ‘ए-सॅट’ मधील फरक न काळणाऱ्यांची कीव येते : मोदी

मेरठ : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरठमधून आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी सभेला उद्देशून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘मिशन शक्ती’ वरुन विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यवर टीकेची झोड उठवली होती. त्याला मोदींनी सडेतोड उत्तर दिले. ‘मिशन शक्ती’ वरून राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे मोदींना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, त्याला मोदींनी झणझणीत प्रत्युत्तर दिले.

याबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “काही बुद्धिमान लोकं अशी आहेत ज्यांच्या बुद्धिमतेची मला कीव येते. काल जेव्हा मी A-SAT विषयी बोलत होतो तेव्हा ते कनफ्युज झाले होते. त्यांना वाटलं मी रंगभूमीच्या थिएटर विषयी बोलत आहे. आता अशा बुद्धिमान लोकांवर हसायचे की रडायचे ? ज्यांना रंगभूमीचा सेट आणि अंतराळातील अँटी सॅटेलाईट मिशन A-SAT याचा अर्थ समजत नाही ” अशा प्रकारे मोदींनी राहुल गांधींना टोला लगावला.

काय म्हणाले होते राहुल गांधी ?

राहुल गांधींनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना मोदींना टोमणा हाणला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, वेल डन डीआरडीओ, तुमच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मात्र, राहुल गांधी यांनी या यशाचं श्रेय मोदींना देणं टाळले आहे. कारण याच ट्विटमध्ये त्यांनी मोदींना ‘वर्ल्ड थियएटर डे’ (जागतिक रंगभूमी दिन) च्या शुभेच्छा दिल्या होत्या.