यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या, तिघे अटकेत

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

याप्रकारामागे हनी ट्रॅप असल्याची जोरदार चर्चा नगर जिल्ह्यात सुरु झाली आहे. पोलीस अधीक्षक आज दुपारी याची संपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत जाहीर करण्याची शक्यता असून त्यातून काही धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी राहता तालुक्यातील कोल्हार परिसरातून मंगळवारी दोघांना अटक केली असून कोल्हापूर येथून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. अटक केलेल्यांपैकी दोघे आरोपी कोल्हार येथील असून एक जण केडगावचा राहणारा आहे. तर मुख्य सुत्रधार हा नगर शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

अहमदनगर -पुणे महामार्गावरील जातोव फाट्याजवळ सोमवारी रात्री रेखा जरे यांची गाडी अडवून दोघांनी त्यांच्यावर हल्ला करुन त्यांची हत्या केली होती. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरुन पोलिसांनी मारेकर्‍यांचा शोध घेतला असून त्यापैकी दोघे कोल्हार येथे लपवून बसले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन कोल्हापूरकडे गेलेल्या तिसर्‍या आरोपीला अटक केली आहे.लवकर यातील प्रमुख लोकांची नावे पुढे येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे़

You might also like