काय सांगता ! होय, भारतात ‘या’ ठिकाणी WhatsApp वर कागदपत्रे पाठवा अन् मिळवा 11 वीत प्रवेश

चंडीगढ : पोलीसनामा ऑनलाइन –  हरियाणा सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना राज्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांना केवळ व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्याकडे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे निकालपत्र आणि आवश्यक ती कागदपत्रे पाठविल्यानंतर 10 वी पास विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयानुसार सद्यस्थितीत महाविद्यालयाची फी जमा करणेही बंधनकारकनाही, असेही सांगितले आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्री कंवल पाल यांनी सांगितले. सोशल डिस्टन्स पाळण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना घरात बसून अकरावीचा प्रवेश घेता येईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी व खबरदारी म्हणून हरियाणा सरकारने हा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री कंवल यांनी दहावी बोर्डाच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतल्याचे जाहीर करताना, परीक्षार्थी आणि शिक्षकांचे देखील अभिनंदन केले.