रिलायन्सने ‘ती’ पाच कार्यालये गुजरातला हलवली

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भारतातील आघाडीचा उद्योग समूह रिलायन्सने आपली पाच प्रशासकीय कार्यालये  गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पाच उपकंपन्यांची कार्यालये सामील आहेत. यातील पाचपैकी चार कार्यालये जीओशी  संबंधित आहेत. तर एक कंपनी रिलायन्सला लागणाऱ्या गुंतवणुकीचा कारभार बघते. यासंबंधी माहिती महाराष्ट्रातील  प्रशासकीय विभागाला देण्यात आली  आहे.

रिलायन्स जिओ मेसेजिंग सर्व्हिसेस लिमिटेड, रिलायन्स जियो इन्फ्राटेल प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि रिलायन्स जिओ डिजीटल सर्व्हिसेस लि. या रिलायन्स जिओशी संबंधित कंपन्या आहेत. तर, रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स आणि होल्डिंग्ज लिमिटेड (आरआयआयएचएल) ही रिलायन्सची गुंतवणूक कंपनी आहे.

धीरूभाई अंबानी यांनी १९६० मध्ये मुंबईत रिलायन्स उद्योग समूहाची स्थापना केली होती. त्यानंतर देशभरात कंपनीचा विस्तार झाला आहे. मात्र, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये  रिलायन्सने मोठ्या प्रमाणात आपला विस्तार केला. पेट्रोकेमिकल्स संबंधित सर्वात मोठी फॅक्टरी गुजरातमधील जामनगर येथे स्थित आहे.दरम्यान, जिओ आणि रिटेल  या दोन शाखांच्या मदतीने  रिलायन्स आपला व्यवसाय रिटेलमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

यासाठी गुजरातमधून सुरुवात केली जाणार असल्यामुळे हि कार्यालये गुजरातला हलवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.  रिलायन्स उद्योग समूहाने  ऑनलाइन घाऊक बाजारात पाऊल ठेवल्याने  डिजिटल रिटेल स्टोअर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.