Corona : फ्री इंधन, गरिबांसाठी अन्न, 100 ‘बेड’चं हॉस्पीटल, रिलायन्सनं केल्या अनेक मोठ्या घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज मुंबईमध्ये कोविड 19 रुग्णालय उभारणार आहे. त्यासोबत अत्यावश्यक सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांना मोफत इंधन उपलब्ध करून देणार आहे. तसेच जी वाहने कोरोना बाधित रुग्णांची ने-आण करण्यासाठी वापरली जात आहेत अशा वाहनांना देखील मोफत इंधन देण्यात येणार आहे. यामध्ये सर्व खासगी आणि सरकारी वाहनांचा समावेश असून यामुळे खासगी संस्था आणि शासनाला फायदा मिळणार आहे. एवढेच नाही तर कंपनीकडून दररोज एक लाख मास्क बनवण्यात येत आहेत. जेणेकरून करोनाच्या संकटादरम्यान गरजूंना याचा उपयोग होईल. तसेच देशातील अनेक शहरांमध्ये फुटपाथ आणि गरीब लोकांना मोफत जेवण देणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजकडून करण्यात आली आहे.

रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटलने दोन आठवड्यात मुंबईमध्ये सेवन हिल्स रुग्णालय तयार केले आहे. या रुग्णालयात 100 बेड्स उपलब्ध करून देण्यात आल आहेत. या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णावर उपचार करण्यात येणार आहेत. सर्व बेड्समध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, व्हेंटिलेटर, पेसमेकर, डायलिसिस मशीन आणि इतर साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या व्यतिरिक्त कंपनीने सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत किराणा दुकान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व 736 स्टोअर्समध्ये किराणा मालाचा पुरेसा साठा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी साठा संपण्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच हे स्टोअर्स किती दिवस सुरु ठेवायचे हे अद्याप ठरलेले नसून स्टोअर उघडण्याचा निर्णय सरकारच्या नियमांनुसार असणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

रिलायन्स कंपनी देशातील जनतेची ज्या प्रमाणे काळजी घेत आहे त्याप्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांची देखील कंपनीकडून काळजी घेतली जात आहे. कोरोनामुळे कंपनीचे काम थांबविले असले तरी कंत्राटी कामगार आणि तात्पुरत्या कामगारांचे पगार कंपनी सुरु ठेवणार आहे. एवढेच नाही तर ज्या कर्मचाऱ्यांना दरमहा 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार आहे त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महिन्यातून दोनवेळा पगार दिला जाणार असल्याची घोषणा रिलायन्स कंपनीकडून करण्यात आली आहे.