Remdesivir :अजित पवारांनी टोचले भाजप खा. डॉ. सुजय विखेंचे कान, म्हणाले – ‘शरद पवारांच्याही ओळखी होत्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना अहमदनगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीतून गुप्तपणे खासगी विमानाने रेमडेसिवीरचा साठा आणला होता. या साठ्याचे मतदार संघात मोफत वाटप केल्यानंतर त्यांनी व्हिडिओद्वारे ही माहिती दिली होती. विखेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रेमडीसीवीरचा तुटवडा असताना, सुजय विखेंना हे इंजेक्शन मिळालेच कसे ?, असा सवाल अनेकांनी फेसबुकवर विचारला. तर यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काहीनी याचिकाही दाखल झाली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार विखेंच कृत्य योग्य नसून ते साहित्य आरोग्य विभागाकडे जमा करायला हवे, अशा शब्दात खडसावले होते. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शरद पवारांचा दाखला देत खासदार डॉ. सुजय विखेंचे कान टोचले आहेत.

लोकप्रतिनिधी असले तरीही रेमडेसिवीरचा साठा करणे अयोग्य आहे, असा शाब्दिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुजय विखे यांना लगावला. कोणीही असले तरी सर्वांनी नियमांचे पालन करून ते जनतेच्या हिताचे आहे, का हे तपासून निर्णय घ्यावे, असेही पवार म्हणाले. खासदार विखे पाटील यांनी आणलेली इंजेक्शने सरकारकडे जमा करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. तुम्ही जरी लोकप्रतिनीधी असला तरी, तुम्ही जे साहित्य आणले आहे.

ते कोणत्या कंपनीचे आहे. त्याची तपासणी झालीय का, त्याला मान्यता आहे का आदी सर्व गोष्टी तपासून दिल्या जातात. आता, मधल्या काळात शरद पवार यांनाही ओळखीमुळे काहींनी दिल्या, त्यावेळी पुण्याच असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना द्या, साताऱ्याचे असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना द्या, मुंबईला द्यायचे असेल तर आयुक्तांना द्या, असे आदेश पवार साहेबांनी दिले होते, असे उदाहरण अजित पवारांनी दिले आहे. विखेंच्या विमानातील व्हिडिओचा आणि फोटोंचा कोणी अतिरेक करु नये, पण लोकप्रतिनिधींनी सगळ्या गोष्टींची शहानिशा करुनच आपले काम केेले पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे.