अर्नब गोस्वामी, त्यांच्या पत्नी यांच्यावर मध्यरात्री ‘प्राणघातक’ हल्ला, पोलिसांकडून दोघे ताब्यात, काँग्रेसवर हल्ल्याचा आरोप (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी  आणि त्यांची पत्नी सामिया गोस्वामी यांच्यावर पहाटे दोघांनी हल्ला केला. ते स्टुडिओमधून घरी जात असताना पहाटे ही घटना घडली. एन एम जोशी पोलीस ठाण्यात पोलिसांनी  ३४१ आणि ५०४ कलमानुसार गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत अर्णब अथवा त्यांच्या पत्नीला काहीही झालेले नाही.

अर्णब गोस्वामी व त्यांची पत्नी सामिया हे मध्यरात्री कारमधून घरी जात असताना दोघे जण  टारसायकलवरुन आले. त्यांनी मोटारसायकल आडवी घालून अर्णब यांना मोटार थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर त्या दोघांनी त्यांच्या कारच्या काच फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच अर्णब यांनी तातडीने कार पुढे नेली. ते थेट त्यांच्या सोसायटीत गेले. त्यानंतर त्यांचे सुरक्षा रक्षक आले. त्यांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदविली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशावरुनच हा हल्ला झाल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. अर्णब गोस्वामी यांनी नुकताच एडिटर्स गिल्ड  ऑफ इंडियाचा राजीनामा दिला होता. सातत्याने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईटलीवाली बाई असे अर्णब गोस्वामी हे संबोधतात. त्यावरुन छत्तीसगडमधील रायपूर येथील काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोस्वामीवर दोन गुन्हे दाखल केले आहेत.

पालघर हत्याकांडाच्या घटनेबाबत रिपब्लिक टिव्हीवर जे वार्तांकन केले. त्यावरुन सोशल मिडियावर चांगलाच गदारोळ माजला आहे. पालघर मॉब लिंचीगमध्ये ३ साधुंची हत्या झाली. ८० टक्के हिंदु असलेल्या भारतात हिंदु साधुंची हत्या होतेय, असे म्हणत अर्णब यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनेक नेटीझन्सने त्यांच्यावर केला आहे. त्यावरुनच अर्णबवर हल्ला झाला असावा, असे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाशी सर्व जण लढा देत असताना पालघर सामूहिक हत्याकांडाला जाणीवपूर्वक जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रिपब्लिक टीव्हीच्या माध्यमातून अर्णब गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. अर्णब यांनी आपल्या चॅनलवर याबाबत वार्तांकन करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टिका केली होती. ईटलीवाली सोनियाजी असा त्यांचा वारंवार उल्लेख केल्याने काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टिका केली होती.