सचिन वाझे प्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांची विकेट पडणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. यामुळे सरकाला बॅकफूटवर जावे लागले. त्यातच सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आल्यानंतर सरकारला टीकेला सामोरे जावे लागत असल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी खांदेपालट होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (सोमवार) सकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांमध्ये राज्यातील परिस्थिवर चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वांत पहिला फटका गृहमंत्री अनिल देशमुख यांना बसणार आहे. अनिल देशमुख यांचे गृहमंत्रिपद काढून घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागल्याने वन मंत्रालय रिक्त आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या गृहमंत्रिपदावर नवीन मंत्र्याची नियुक्ती केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मागील वर्षभरात अनिल देशमुख यांच्या खात्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि आताचे ताजे असलेले सचिन वाझे प्रकरण. या प्रकरणांमध्ये गृहमंत्र्यांना आपली चोख कामगिरी दाखवता आलेली नाही, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या दोन्ही ज्येष्ठ नत्यांमध्ये आहे.

गृहमंत्र्यांवर शरद पवार नाराज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून अनिल देशमुख यांची ओळख आहे. मात्र, त्यांच्या मागील वर्षभरातील कामगिरीवर शरद पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या जागेवर शिवसेनेच्या मंत्रिमंडळाच्या बाहेरील नव्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासह काँग्रेसदेखील अंतर्गत काही फेरबदल करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात दिल्ली हायकमांड आणि पक्षातील ज्येष्ठ नेते निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे राज्यात लवकरच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

मंत्र्यांना दुपारी दिली जाणार माहिती

दोन्ही नेत्यांच्या चर्चेदरम्यान मंत्रिमंडळातील खाते बदलाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या मंत्र्यांच्या विभागामध्ये काही बदल करायचे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आज दुपारी संबंधित मंत्र्यांना खातेबदलाबद्दल माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याचे खाते बदलणार, कोणत्या मंत्र्याचे मंत्रिपद जाणार आणि कोणत्या आमदाराची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.