पोलीस महासंचालक घेणार आयुक्तालयात आढावा बैठक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्तीझाल्यानंतर सुबोधकुमार जयस्वाल हे प्रथमच मंगळवारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयास भेट देणार आहेत. यावेळी आढावा बैठक घेणार असून आयुक्तालयास जाणवणारी मनुष्यबळाची कमतरता, वाहने, इतर साधन सामग्री यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस यांच्यातील काही भाग वगळून स्वतंत्र पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयमंजूर करण्यात आले. १५ ऑगस्ट २०१८ रोजी आयुक्तालयाचा कारभार पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी सुरु केला. अपुरे मनुष्यबळ, इमारत, वाहनांची समस्या, अपुरी साधन सामग्री अश्यातच आयुक्तालय सुरु आहे. मात्र काही खासगी कंपन्यांनी वाहने दिल्याने थोडीशी वाहनांची समस्या दूर झाली आहे.

महापालिकेने पोलीस आयुक्तालय, मुख्यालय आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयास जागा दिल्याने त्याचाही सध्यापुरता प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र मनुष्यबळ आणि इतर साधन सामग्री हा प्रश्न आजही ‘जैसे थे’च आहे. मंगळवारी (१६ / ०४ / २०१९) पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हेआयुक्तालयास भेट देणार आहेत. यावेळी अनेक समस्या आणि प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पोलिस महासंचालक यावेळी आढावा बैठक घेणार असून पोलिस महासंचालक कार्यलयाकडून देण्यात आलेल्या १५ एर्टीगा कारही पोलीस आयुक्तालयास सुपूर्त करणार आहेत.