सशस्त्र दरोड्यात पती-पत्नी जखमी, रोख रकमेसह चार तोळे सोने लुटले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लहानू सीताराम गाडीवान यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून घरातील पती-पत्नीला जबर मारहाण करून चाळीस हजार रोख व चार तोळे सोन लुटले. अहमनगरमधील शेवगाव तालुक्यातील बोधेगावपासून ७ कि.मी अंतरावर असलेल्या मुरमी गावाजवळ हा प्रकार घडला. दरोडेखोरांच्या मारहाणीत लहानू गाडीवान (५५) हे गंभीर जख्मी झाले असून, त्यांच्यावर नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गाडीवान यांच्या जवळ असलेल्या शहादेव मोहन शिंदे यांच्या वस्तीवर दरोडेखोर आले होते. परंतु ते जागे झाल्याने दरोडेखोर पळाले. शिंदे यांनी याबाबत इतरांना फोन करुन कल्पना दिली. लहानु गाडीवान यांच्या मुलासही फोन केला होता. परंतु त्याचा मोबाईल बंद होता. याच वेळी दरोडेखोरांनी आपला मोर्चा लहानू गाडीवान यांच्या वस्तीकडे वळवला घराच्या पढवित लहानू गाडीवान व त्यांच्या पत्नी आशाबाई गाडीवान हे दोघे झोपले होते. दरोडेखोरांनी त्यांना मारहाण करून रोख रक्कमेची मागणी केली.

दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी गाडीवान यांच्या पोटावर तलवारीने वार केले, तसेच आशाबाई यांच्या कानातील सोन्याची कर्नफुले ओरबडुन त्यांनाही मारहाण केली. घरात शोधाशोध करून एका लोखंडी पेटीत ४३ हजार रोख व ४ तोळे सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले. लहानू गाडीवान यांचा मुलगा राम व त्याची पत्नी ज्योती हे शेजारील खोलीत झोपले होते. वडिलांचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्याने दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला.

मात्र दरोडेखोरांनी त्याच्यावर तलवार रोखुन त्याला आतच थांबण्यास भाग पाडले व बाहेरून घराला कडी लावली. त्यानंतर रामने मोबाईलवरुन शेजारील शहादेव शिंदे यांना याबाबत कल्पना दिली. तेव्हा शिंदे यांनी सर्वांना जागे केले. यानंतर सर्व गावकरी गाडीवान यांच्या वस्तीवर आले. मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेउन पळुन गेले. दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लहानु गाडीवान यांना व त्यांच्या पत्नीला रूग्णालयात दाखल करण्यात आले.