देवीच्या मंदिरात दरोडा ; सुरक्षा रक्षकांना बांधून दानपेटीतील रक्कम लंपास

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र असलेल्या भिवंडीतील वज्रेश्वरी देवी मंदिरात आज पहाटेच्या सुमारास दरोडा पडला आहे. १० ते १५ जणांनी सुरक्षा रक्षकांना बांधून ठेवत मंदिरातील दानपेट्या फोडून पोबारा केला. पोलिसांना माहिती मिळताच तेथे धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील वज्रेश्वरी देवी मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास १० ते १५ दरोडेखोरांनी मंदिरात घूसून तेथील सुरक्षारक्षकांना बांधून ठेवले आणि त्यानंतर मंदिरातील दानपेट्या फोडल्या. या दानपेट्यांमधील रोकड घेऊन हे दरोडेखोर पसार झाले आहेत. दरम्यान मंदिरावरील दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ परिसराची पाहणी केली असून तेथील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. तर दरोडेखोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

दरम्यान, मंदिरातून किती रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र या दरोड्याच्या निषेधार्थ वज्रेश्वरी गावातील नागरिकांनी तेथे बंद पाळला आहे.