रोहित पवारांनी पुन्हा भाजपला डिवचल’, म्हणाले – ‘जलयुक्त’मध्ये पाणी मुरले की पैसे हे स्पष्ट होईल

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेमुळे ‘शिवार’ खरंच जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले?, हे आता स्पष्ट होईल, अशी खोचक टीका आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. याबाबतचं टि्वट रोहित पवार यांनी केलं आहे. ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला.तब्बल ९६३३ कोटी रूपये खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास झाला पाहिजे, असे रोहित पवार यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. काल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर टीका केली होती. आता आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाना साधला आहे. त्यामुळे आता भाजप रोहित पवारांना काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवार चर्चेत राहण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांवर टीका करतात, असा आरोप नुकताच केला होता. आता पुन्हा रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

कोरोनातील अपयश समोर आल्याने आणि मेट्रो कारशेडचं पितळ उघड केल्याने सरकारमध्ये पोटशूळ निर्माण झाला व त्यातूनच जलयुक्त शिवार योजनेवर अविश्वास दाखविण्यात आला. चौकशी जरूर करा, पण या योजनेला मोठ्या प्रमाणावर मिळालेला जनसहभाग पाहता ही चौकशी म्हणजे जनतेवरील अविश्वासच आहे, असेही दरेकर यांनी काल म्हटले होते.

प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे की जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे ही योजना बदनाम करून खानदेश विदर्भ मराठवाड्याचा निधी इतरत्र वळविण्याचा डाव आहे. योजनेची चौकशी जरूर करा, पण यानिमित्ताने विदर्भ मराठवाड्याचा निधी इतरत्र वळवू नका.