‘काँग्रेससोबत असताना झाली होती माती, म्हणूनच माझ्यासमोर आहे ‘युती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेससोबत असताना झाली होती माझी माती, म्हणूनच माझ्यासमोर आहे भाजप-शिवसेनेची युती. मी तर आहे साऱ्या महाराष्ट्राचा साथी, असे म्हणत रामदास आठवले यांनी आपण युतीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. ते शिर्डीमध्ये बोलत होते.

काँग्रेसनेच मला बंगल्यातून बाहेर काढले, माझे सामान घराबाहेर काढले, माझे फोटो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो बाहेर काढले. शिर्डीमध्ये काँग्रेससोबत असताना माझी जाली होती माती म्हणूनच माझ्यासमोर आहे युती, असी नेहमीच्या स्टाईलमध्ये कविता करत आठवलेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी भाजपसोबत रुळलेलो आहे, कारण माझ भाजपसोबत जुळलेल आहे, असे म्हणत आपण युतीसोबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी मागितलेल्या जागेवर काय होतं ते पाहुया. भाजपाने एक जागा आणि शिवसेनेनं एक जागा सोडावी, अशी माझी मागणी होती. मी लोकांमधला नेता आहे, त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघातून मी उभारावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. त्यामुळे माझ्या पक्षाला कमी लेखण्याचं काहीही कारण नाही, असे म्हणत अजूनही आठवले यांनी आशावाद व्यक्त केला आहे.

तसेच भाजपा बाबासाहेबांना मानते, नरेंद्र मोदी बाबासाहेबांना मानतात. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाल्याचे मोदी सांगतात, याचाही उल्लेख आठवलेंनी केला. दरम्यान, देशात भाजपला २८२ जागा मिळाल्या, महाराष्ट्रात ४२ जागा मिळाल्या. यावरुन दलितांचीही मते भाजपाला मिळालीत, हे स्पष्टपणे दिसून येत असल्याचा दाखलाही आठवलेंनी दिला.