करदात्यांसाठी दिलासा ! ITR भरण्याची तारीख पुन्हा वाढविण्यात आली, नवीन मुदत जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्राप्तिकर विभागाने कर भरणाऱ्यांना दिलासा देत पुन्हा रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढविली आहे. प्राप्तिकर विभागाने असे म्हटले आहे की, आता सामान्य नागरिक सन 2019 – 20 साठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत रिटर्न भरू शकतात. यासाठी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 रोजी निश्चित करण्यात आली होती.

वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वैयक्तिक करदात्यांसाठी आयकर रिटर्न 2019-20 भरण्याची अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्या करदात्यांचे खाते ऑडिट करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत दोन महिन्यांनी वाढवून 31 जानेवारी 2021 करण्यात आली आहे.

सुरुवातीच्या मे महिन्यात सरकारने कर भरणाऱ्यांना सवलत देऊन आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयटीआर दाखल करण्याची मुदत 31 जुलै केली होती नंतर ती 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका निवेदनात म्हटले आहे की, “ज्या करदात्यांची आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020 होती, त्यांची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.”

त्याचप्रमाणे, ज्या करदात्यांचे खाते ऑडिट करणे आवश्यक आहे आणि ज्यांची पूर्वीची मुदत 31 ऑक्टोबर 2020 होती, ते आता 31 जानेवारी 2021 पर्यंत आयटीआर दाखल करू शकतात. करदात्यांना आयटीआर भरण्यासाठी अधिक मुदत देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सीबीडीटीने सांगितले आहे.