‘कोरोना’मुक्तीच्या नंतरच ऑलिम्पिक पात्रतेचा विचार : हिमा दास

पोलिसनामा ऑनलाईन – टोकियो ऑलिम्पिकसाठी स्थान निश्चित करता आले नसले तरी भारताची अव्वल धावपटू हिमा दासला त्याची पर्वा नाही. ऑलिम्पिक पात्रतेच्या विचाराने तिची झोप उडाली नसून सध्या तिने सायकल आणि क्रिकेट खेळत सरावावर भर दिला आहे. कोरोनामुक्तीनंतर ऑलिम्पिक पात्रतेकडे पाहू, असा निर्धार हिमाने व्यक्त केला.

सध्या कोणत्याही स्पर्धा नसल्यामुळे हिमा दासने मध्यम स्वरूपाच्या सरावावर लक्ष केंद्रित केले आहे. घामाच्या धारांवर मात करण्यासाठी तिने धावण्याच्या व्यतिरिक्त सराव सुरू ठेवला आहे. “सध्या कोणत्याही स्पर्धा होणार नसल्यामुळे मी एकदम हलक्या स्वरूपाचा किंवा कठोर सराव करत नाही. शारीरिक तंदुरुस्तीइतकाच सराव मी करत आहे. पतियाळामध्ये उष्ण वातावरण असल्यामुळे आम्ही पहाटे सराव करत आहोत. संध्याकाळी सायकलिंग किंवा क्रिकेटच्या चेंडूने गोलंदाजी करण्याचा सराव आम्ही करत आहोत,” असे हिमाने सांगितले. “शक्य होईल तितका जीवनाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न मी करत आहे. सकारात्मक आणि आनंदी राहणे हाच माझ्या जीवनाचा मूलमंत्र आहे. ऑलिम्पिक पात्रतेची मी फारशी चिंता करत नाही. त्यामुळे फक्त दडपणात वाढ होते. ऑलिम्पिक पात्रतेसाठी अद्याप एका वर्षांचा कालावधी असल्यामुळे करोनाचे संकट दूर झाल्यावर त्याचा विचार करता येईल. 1 डिसेंबरपासून अ‍ॅथलेटिक्सच्या मोसमाला सुरुवात होणार असून त्यानंतर पात्रता स्पर्धामध्ये मी ऑलिम्पिकसाठीचे स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असेन,” असेही तिने सांगितले.