‘राज्य चालवणं हे येड्या गबाळ्याचं काम नव्हे’ : रावसाहेब दानवे

पैठण : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीत राज्यकर्त्यांनी दौरे करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मी आणि माझे कुटुंब असं म्हणत घरात बसले आहेत. राज्य चालवणं हे येड्या गबाळ्याचं काम नव्हे असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाचं वाभाडं काढलं आहे. आज पैठण येथे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनं प्रसंगी ते बोलत होते.

दानवे म्हणाले, राज्यातील आघाडी सरकार हे अमर-अकबर-अँथनी सरकार आहे. सरकार नेमकं कोण चालवतं, निर्णय कोण घेतं हेच कळत नाही. राज्यावर आलेल्या संकटांच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे पदाधिकारी राज्यभर दौरे करत आहेत. तर दुसरीकडे मात्र मी आणि माझं कुटुंब म्हणत राज्याचे प्रमुख घरात बसल्याचं दुर्दैव राज्यातील जनतेला पहाव लागत आहे” अशी टीका दानवेंनी केली.

‘कृषी कायदा शेतकरी हिताचा’
पुढे बोलताना दानवे म्हणाले, “केंद्राचा कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असून बाजार समितीच्या अस्तित्वाला कुठेही धक्का लागणार नाही. मात्र बाजार समितीच्या आडून शेतकऱ्यांची होणारी लूट मात्र थांबणार आहे. आघाडी सरकारनं या कायद्याला विरोध केला असून राज्यात कायद्याला स्थिगिती दिली हे बेकायदेशीर आहे” असंही त्यांनी सांगितलं.

आषाढी एकादशीला पंढरपूर सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाथमहाराजांची पालखी गोदावरी काठावर असलेल्या पालखी ओट्यावर भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. याच ठिकाणी पैठणकर जमा होऊन पालखीस निरोप देतात. या पालखी ओट्याचं सुशोभीकरण आणि इतर विकास कामं 2 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार आहे. या विकासकामाचे भूमीपूजन आज केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.