‘मला विखेंच्या सल्ल्याची गरज आहे, परंतु…’ : हसन मुश्रीफ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राधाकृष्ण विखे पाटील यांना मी 14 ऑगस्टला झालेल्या बैठकीला बोलवलं होतं. परंतु ते आले नाहीत. ते ज्येष्ठ नेते आहेत व मी ज्युनियर आहे. म्हणून ते आले नसावेत. परंतु मला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे असं म्हणत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

हसन मुश्रीफ म्हणाले, “मी आधीच सांगितलं होतं की, महिन्यातून किमान एकदा नगरला मुडदा किंवा जिंदा येईनच. गेल्या 8 महिन्यात मी 14 वेळा नगरला आलो आहे” असंही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं.

नगरमध्ये कोरोना संसर्ग वेगानं वाढत आहे. मात्र 15 ऑगस्टनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नव्हते. यावरून माजी मंत्री राधाकृष्ण यांनी नगरला बोलताना त्यांच्यावर टीका केली होती. सरकारमध्ये काम करणाऱ्या सत्ताधारी पक्षातील लोकांचा पब्लिसिटी इव्हेंट चालू आहे. त्यांना जनतेची काळजी नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्रांना तर नेमकी कशाची काळजीय ? त्यांचा तर सगळा वेळ ग्रामपंचायतवर मागच्या दारानं प्रशासक म्हणून आपले बगलबच्चे नेमण्याच्या प्रयत्नातच गेला अशी टीका विखे पाटील यांनी केली होती.

विखे पाटलांच्या टीकेचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज चांगलाच समाचार घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना अनुषंगानं आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आशुतोष काळे, महपौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात होणाऱ्या सगळ्या मीटींगला सर्व मंत्र्यांना बोलवले जात नाही. ज्या मीटींगला त्यांना ते येतातच. 14 ऑगस्टला मी जी बैठक घेतली होती त्याला सर्व लोकप्रतिनिधींना बोलवलं होतं. त्या बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी आले. परंतु राधाकृष्ण विखे पाटील आले नाहीत. कदाचित ते ज्येष्ठ नेते आणि मी ज्युनियर म्हणून ते आले नसावेत. परंतु मला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे.”

पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले, “आजपर्यंत तब्बल माझी नगरला भेट झाली आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी आपण चांगल्या निधीची तरतूद केली होती. परंतु दुर्दैवानं कोरोना आला. नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल काढण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. नगर मला सुंदर करायचं आहे. कोरोनाच्या परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर माझं ते स्वप्न मी नक्की पूर्ण करेन.” असंही हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं.